पुणे

पुणे: हडपसर – सासवड रोडवर शिवशाही बस आणि कंटेनरचा मध्यरात्री भीषण अपघात, एक ठार, सहा गंभीर जखमी

पुणे : राज्यातील रस्ते अपघातांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीय. रविवारी मध्यरात्री उरुळी देवाची हद्दीतील सासवड इथं भीषण अपघात झाला. एका कंटेनर आणि शिवशाही बसमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये एक जण ठार झाला असून पाच ते सहा जण जखमी झालेत. मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एका प्रवाशाचा जागच्या जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. तर पाच ते सहा प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय. सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमका कसा झाला अपघात?

पुणे सासवड रोड वर उरुळी देवाची फाट्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली. उरुळी देवाची फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊनमधून कंटेनर निघाला होता. तो सासवड रस्त्यावर येत होता. नेमक्या याच वेळी पुण्याच्या दिशेने येत असलेल्या एका शिवशाही बसच्या चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही. अखेर रस्त्यावर आडव्या दिशेत असलेल्या कंटेनरला भरधाव शिवशाही बसने जोरदार धडक दिली.

पंढरपूरहून प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेनं जात असताना शिवशाही बसचा अपघात झाला. भरधाव शिवशाही बसची ही धडक इतकी भीषण होती, की चालकासह प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. यात कंटनेरचंही नुकसान झालं, तर शिवशाही एसटी बसलाही फटका बसला. शिवशाही बस आणि कंटेनरच्या या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य करण्यात आलं.

अपघातामुळे वाहतुकीची कोंडी

पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. तर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त शिवशाही बसला रस्त्यावरुन बाजूला हटवण्यात आलं. दरम्यान, या अपघातामुळे उरुळी देवाची फाट्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर अपघातग्रस्त बस हटवल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra