आरोग्य

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना! बोगस मुन्नाभाई डॉक्टरने ३० हून अधिक माणसांना टोचले चक्क जनावरांचे इंजेक्शन

गावातील मानेचे, गुडघ्याचे पाठीचे दुखणे ज्या लोकांना आहे. त्यांना नेमके दुखणार्‍या जागेवरच इंजेक्शन दिले

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

नगर (दि.८) : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावरील खंडोबावाडीत एक भयानक प्रकार समोर आला आहे. मुन्नाभाई डॉक्टरने चक्क जनावरांना देण्यात येणारी औषधे व इंजेक्शन माणसांना टोचल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे. या तोतया डॉक्टरने गेल्या दोन दिवसांत सुमारे ३० हून अधिक महिला व पुरुषांना पाठ, गुडघा, मानेला दुखनाऱ्या जागेवरच जनावरांचे इंजेक्शन दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. राजेंद्र सदाशिव जवंजळे (रा. आदेशपुरा, जि. बीड) असे या बोगस मुन्नाभाई डॉक्टरचे नाव असून, पाथर्डी पोलिस ठाण्यात या मुन्नाभाई डॉक्टर विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गावातील काही जबाबदार नागरिकांनी या डॉक्टरला पकडून तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बाबासाहेब होडशीळ यांच्या ताब्यात दिले. तिसगाव येथे या डॉक्टरच्या बॅगेतील औषधांची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर त्याला पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले,

गावातील तरूणांच्या सतर्कतेमुळे लोकांचा जिवावरील धोका टळला आहे.

डॉक्टर माणसाचे आहेत तर मग औषधांच्या बाटल्यावर जनावरांची चिन्ह कशी? अशी शंका गावातील तरुण राजू राठोड, शंकर जाधव, पंडित जाधव, अनिल जाधव, सुनील चव्हाण यांना आल्यानंतर त्यांनी करंजी येथील प्राथमिक उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी दिलीप तांदळे यांना बोलावून घेतले. त्यांनी देखील या सर्व औषधांची पाहणी केल्यानंतर या बोगस डॉक्टरला गावातील तरुणांच्या मदतीने तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

एका इंजेक्शनला तब्बल ५०० रुपये उकळायचा

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, करंजी जवळील खंडोबावाडी येथे गेल्या दोन दिवसापासून राजेंद्र सदाशिव जवंजळे हा डॉक्टर म्हणून या गावात आलेल्या व्यक्तीने मानेचे, गुडघ्याचे पाठीचे दुखणे ज्या लोकांना आहे त्यांना नेमकी दुखणार्‍या जागेवरच इंजेक्शन देऊन प्रत्येक व्यक्तीकडून पाचशे रुपये उकळत होता. गेल्या दोन दिवसापासून हा बोगस डॉक्टर या गावातील लोकांना इंजेक्शन टोचण्याचे काम करत आहे. गावातील काही तरुणांनी या डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चिन्ह आढळून आली. त्यामुळे या गावात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra