
(नरसिंग कांबळे – मुख्य संपादक)
पुणे : महाराष्ट्रात जुगारबंदी आहे हे प्रत्येक नागरिकांना माहिती आहे. परंतु खडकी स्टेशन येथे जुगार बंदी आहे की नाही, असा प्रश्न येथील सर्वसामान्यांना पडलेला आहे. कारण काही दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात काटी नावाचा जुगार सुरू असल्याचे बोलले जात आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या खडकी स्टेशन, औंध रोड, साई बाबा मंदीर समोर, त्रिमूर्ती बियर शॉप शेजारी दिवसा मटका व रात्री लाखो रुपये लावून खेळला जाणारा काटी नावाचा जुगार खुलेआम पैशावर खेळवित असल्याची चर्चा सुरू आहे. सदर जुगार अड्ड्याचा संस्थापक बबलू नावाचा इसम असल्याची चर्चा आहे. मात्र या जुगार अड्ड्यावर स्थानिक खडकी पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई होत नसल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणी तक्रार केली की तात्पुरती कारवाई केली जाते त्यानंतर काही दिवसांनी परत आहे त्याच जोमात हा जुगार अड्डा सुरू होतो असे एका नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर महाराष्ट्र मित्रशी बोलताना सांगितले. मागील काही वर्षांमध्ये या बबलू नावाच्या इसमावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत असंख्य गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे. हे पोलिसांनी तपासून यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. या ठिकाणी बाजूलाच खडकी रेल्वे स्टेशन व सेंट थॉमस पब्लिक स्कूल आहे. त्यामूळे येथे नेहमीच नागरिकांची, शाळकरी विद्यार्थ्यांची ये जा असते, त्यामुळे येथे जुगार खेळण्यासाठी जमलेल्या टोळक्यांचा या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण खडकी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे काही अंतरावरच आहे. त्यामुळे जे सर्व सामान्य नागरिकांना दिसत आहे ते खडकी पोलिसांना दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बबलु करतोय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला चॅलेंज?
संपूर्ण पुणे शहरांमध्ये दोन नंबर धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्याणाऱ्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाकडून काही महिना अगोदरच या बबलू नावाच्या इसमावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मग या इसमाने सदर जुगार अड्डा बंद करायला हवा होता. मात्र त्याने तसे केले नाही. काही दिवस उलटून गेल्यावर आता त्यापेक्षा अनेक पटीने मोठा व लाखो रुपये लावून खेळला जाणारा काटी नावाचा जुगार सुरू करून सामाजिक सुरक्षा पथकाला एक प्रकारे चॅलेंज केले की काय असे येथील नागरिकांना वाटू लागले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी खडकी स्टेशनच्या जुगार किंग बबलुवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मागिल काही वर्षांपासून ते आत्तापर्यंत किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती घेऊन मोक्का कायद्या अंतर्गत दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी येथील सर्वसामान्य जनता करत आहे.




