शिक्षण

शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची दर पाच वर्षांनी होणार चारित्र्य पडताळणी! शाळेतील मुलींवरील अत्याच्यार रोखण्यासाठी प्रशासनाचा आदेश

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

पुणे : पुणे जिल्ह्यातील असंख्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्ह्यामधील शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची दर पाच वर्षांनी चारित्र्य पडताळणी होणार आहे. शाळेतील मुलींवर अत्याच्यार होण्याच्या वाढत्या घटना पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेशही प्रशासनाकडून शाळांना देण्यात आले आहेत. भिगवण इथं जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलीवर अत्याचारी घटना उघडकीस आली होती. त्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळतंय. शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, दर्शनी भागात हेल्पलाईन नंबर लावणं, तक्रार पेटी ठेवणं, यासारख्या उपाययोजना करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसंच विद्यार्थ्यांनाही गुड टच-बॅड टच याबाबत प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शाळेत मुलींवर होणारे अत्याचर थांबतात का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पालकांच्या लेखी परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तीला भेटू देऊ नये, असंही आदेशात म्हटलंय. त्याबाबत सुरक्षारक्षकांनाही माहिती दिली जावी, असंही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं.

आदेश नेमका काय आहे?

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी आवाहन करत शाळांना सूचना दिल्यात. लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानं शाळेनं पीडितेची बाजू घेत तिला मदत करावी. लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयांनाही द्यावी. विद्यार्थ्यांना गोपनीयरीत्या तक्रार नोंदवता कशी येईल, याची तजवीज करावी. सिक्युरीटी बेल बसवाव्यात. विद्यार्थ्यांचे हात पोहोचतील अशा उंचीवर या बेल बसवल्या जाव्यात. एखादी तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही करावी. चाईल हेल्पलाईन नंबर १०८९, पोलिसांचा नंबर १००, महिला सुरक्षा नंबर १०९० आणि इमर्जन्सी नंबर ११२ याबाबतचे फलकही लावले जावेत, अशा सूचना प्रशासनाकडून केल्या जाव्यात.

भिगवण मध्ये नेमक काय घडलं होतं?

भिगवणमध्ये झेडपीच्या शाळेतील एका विद्यार्थीनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्याने एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीने केलेल्या तपासणीत शिक्षक दोषी आढळून आला होता. त्यानंतर नराधम शिक्षकाचं निलंबनही करण्यात आलं होतं. या घटनेची जिल्हा परिषद प्रसशानाच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra