मुंबई मेट्रो ३ ची पहिली ट्रायल रन यशस्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला हिरवा झेंडा

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि तितकाच वादग्रस्त ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो ३ च्या चाचणीला अखेर आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो लाइन ३ च्या या चाचणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला.
हा पहिला टप्पा मेट्रोच्या ६७ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प सुरु करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आरे सारीपूतनगर इथे ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवला. ज्यानंतर सारीपूतनगर ते मरोळ नाका येथील ट्रॅकवर ट्रायल रन घेण्यात आली. सारीपूतनगर ते मरोळ नाका स्थानकादरम्यान ३ किमी लांबीच्या बोगद्यात ही चाचणी घेण्यात आली, ज्यात बीकेसी आणि धारावीला जोडण्यासाठी ३ भुयारी मार्ग आहेत. एकूण ८ डब्ब्यांची ही पहिली मेट्रो असणाक असून प्रत्येकी ४२ टन वजनाचा कोच या मेट्रोला जोडला जाईल. यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ३३.५ किमी लांबीचा भूमिगत मेट्रो कॉरिडोर तयार करत आहे.
एमएमआरसीएल अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ही मेट्रो प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहे का याचा सर्वप्रथम विचार केला जाईल. त्यानंतर मध्यम आणि हाय वोल्टेजवर ट्रेनची चाचणी केली जाईल. त्याशिवाय ब्रेकची क्षमता, एअर कम्प्रेसर, स्वयंचलित दरवाज्यांची कार्यक्षमता, वायुविजन याचीही चाचणी होईल. मेट्रो-३ ची चाचणी ही भूमिगत चाचणी होणार आहे. ज्यात १००० किमी ट्रायल रन सहा महिन्यांच्या कालावधीत केले जातील, या ट्रायल्स रन तात्पुरत्या सुविधा क्षेत्रापासून सुरु होणाऱ्या बोगद्यांमध्ये घेतल्या जातील. मात्र आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी MMRCL ला ८ मेट्रो गाड्यांची आवश्यकता आहे.
३३.५ किमी लांबीचा भूमिगत मेट्रो मार्ग दक्षिण मुंबई आणि उपनगरांना जोडणारा मार्ग दोन टप्प्यांत सुरु होईल. यातील MMRCL सीप्झ आणि बीकेसी दरम्यानच्या कॉरिडॉरचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत होईल तर बीकेसी आणि कुलाबादरम्यानचा दुसरा टप्पा जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मेट्रो ३ मार्गाचे कामं २०२१ पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यावेळी हा खर्च २३,२३६ कोटी रुपये होता. मात्र काही कारणास्तव हे काम रखले आणि आता हाच खर्च आता ३७,२७५कोटी रुपयांवर पोहचला आहे.
मेट्रो मार्गावर किती स्टेशन्स असणार?
मेट्रो ३ च्या लाईनवर बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, डोमेस्टिक एयरपोर्ट, सहार रोड, इंटरनॅशनल एयरपोर्ट, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ, आरे डेपो अशी स्टेशन्स असणार आहेत. आठ डब्यांच्या मेट्रोसाठी ८५ किमी ते ९५ किमी प्रति तास ही गती असणार आहे. ‘ट्वीन बुटेड लो व्हायब्रेशन ट्रॅक हाय अटेंनयूएशन’ असे नव्या प्रकारचे क्रॅक्स स्ट्रक्चर भूमिगत मेट्रोसाठी भारतात प्रथमच स्वीकारले आहे.
मेट्रो ३ चा प्रवाशांना काय होणार फायदा?
मुंबई मेट्रो लाईन ३ च्या ट्रेन्स आठ डब्यांसह धावणार आहेत. यात सुरुवातीपासून प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत बदल केला जाईल. ७५ टक्के मोटाराजेशनमुळे मेट्रोची धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील. रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विजेची बचत होईल. त्याशिवाय चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज देखील कमी होईल. मेट्रो ट्रेनच्या डब्यांची रुंदी ३२०० मीमी असून उभे आणि बसलेल्या स्थितीत अंदाजे २४०० प्रवासी एका मेट्रोतून प्रवास करू शकतील. याशिवाय मेट्रो डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डाय ऑक्साईड आणि आद्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही हवामान परिस्थितीत प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येईल.
याशिवाय मेट्रो ३ च्या प्रत्येत डब्ब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन, धूर, अग्निशोधक यंत्रणा, आर्द्रता नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. यात जाहिराती आणि प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एलसीडी लावण्यात आले आहेत. ज्यात संपूर्ण मेट्रो मार्गाचा डिजिटल नकाशाही दाखवला जाईल. दिव्यांग प्रवाशांसाठी व्हिलचेअर ठेवण्यासाठीही खास सोय यात करण्यात आली आहे. याशिवाय बसण्यसाठी उत्तम बैठक व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि मेट्रो नियंत्रक यांच्या संवादासाठी ध्वनीयंत्रणा दिली आहे.



