पुणेसामाजिक

धावत्या एस टी बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका; मृत्यूपूर्वी वाचवले २५ प्रवाशांचे प्राण.

पुणे : जीवापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे, असे समजून अनेक जण आपल्या कर्तव्याला महत्त्व देतात, परंतु जेव्हा जीवावर बेतते, तेव्हा काही क्षण कर्तव्य देखील बाजूला ठेवावे लागते.
परंतु एका कर्तबगार बस चालकाने जीवाची पर्वा न मोठी कामगिरी बजावल्याचे पुढे आले आहे. पुणे-कोल्हापूर महामार्गावर वेगाने एसटी बस धावत होती. त्याचवेळी चालकाच्या छातीत कळ आली. ही बाब त्याच्या लक्षात येताच त्याने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यानंतर या चालकाने स्टेअरिंगवरच प्राण सोडले. विशेष म्हणजे, या दुर्देवी घटनेत कोणत्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारे इजा झाली नाही. त्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

एसटी महामंडळातील चालकांकडूनही असे कर्तव्य बजावले गेले. याची सर्वत्र चर्चा होत आहे. स्वत:चा काळ आला असताना चालकाने एसटीमध्ये बसलेल्या तब्बल २७ प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित केले आणि त्यानंतरच जगाचा निरोप घेतला. पुरंदर तालुक्यातील राजगडाजवळ घडली आणि त्या जिगरबाज चालकाचे नाव जालिंदर रंगराव पवार आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, वसई-म्हसवड (सातारा) ही एसटी बस (एमएच १४, बीटी ३३४१) दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट स्थानकात आली. तेथे चालकांची बदली झाली आणि गाडीचा ताबा जालिंदर रंगराव पवार (वय ४५, रा. पळशी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी घेतला. त्यानंतर गाडी म्हसवडच्या दिशेने रवाना झाली. पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोलनाक्याच्या पुढे वरवे गावाच्या हद्दीत आल्यानंतर गाडीचा वेग अचानक मंद झाला. त्यावेळी त्यांचे सहकारी वाहक संतोष गवळी यांनी केबिनजवळ जाऊन त्यांना गाडीचा वेग कमी का केला? असे विचारले, त्यावेळी पवार यांचा चेहरा घामाने भिजून गेला होता, मला चक्कर येत आहे असे सांगितले.

असह्य वेदना होत असतानाही त्यांनी गाडीवरचे नियंत्रण सोडले नाही आणि गाडी सावकाश रस्त्याच्या डाव्या कडेला लावली व सुरक्षित थांबविली. त्यांच्या छातीमध्ये प्रचंड कळ आली आणि त्यांनी स्टेअरिंगवरच डोके ठेवले. त्यांना उठविण्यासाठी वाहक गवळी केबिनमध्ये धावून आले. त्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते उठले नाहीत. त्यानंतर गाडीचा ताबा एका प्रवाशाने घेतला व गाडी तातडीने जवळच असलेल्या नसरापूर येथील सिद्धिविनायक येथील रुग्णालयात नेली.

पंचवीस प्रवाशांसह गाडी रुग्णालयात पोचली. चालकाला हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी कल्पना एसटीतील सर्वच प्रवाशांना आली होती. त्यामुळे जालिंदर यांना रुग्णालयात उपचारासाठी नेल्यावर प्रत्येक प्रवाशी त्यांच्या सुखरूप होण्यासाठी प्रार्थना करत होता. मात्र सर्व प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी अगदी वेळेवर एसटी बाजूला उभी करणाऱ्या जालिंदर यांना मात्र रुग्णालयात उपचारासाठी वेळेत पोहोचता आले नाही आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

विशेष म्हणजे हृदयविकाराचा तीव्र झटका आला असतानाही जालिंदर यांनी तो सहन केला, केवळ प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी. वेगात असणाऱ्या एसटीवरील नियंत्रण सुटले असते तर कदाचित एसटीचा अपघातही झाला असता. त्यामुळे एसटीतील पंचवीस प्रवाशांबरोबर बाहेरील वाहनांच्या अपघाताची शक्यताही निर्माण झाली असती. मात्र जालिंदर यांच्या कर्तव्यदक्षपणे मृत्यूलाही थोडा वेळ बाजूला ठेवले आणि त्यांनी प्रवाशांना सुरक्षित करून त्याच स्टेअरिंगवर देह ठेवला. या घटनेमुळे अनोळखी चालकासाठीही एसटीतील सर्व प्रवाशांचे डोळे पाणावले. त्यांच्या मृत्यूनंतर भोर येथील रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra