पुणेसामाजिक

मंत्रिमंडळ विस्तारात पुण्याला एक मंत्रीपद, चंद्रकांत दादा पाटलांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, इतरांना संधी नाही?

(✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे)

पुणे : काल राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये पुणे जिल्ह्याला कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने मंत्रिपद मिळाले. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या जिल्ह्यातील इतर नेत्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळालेली नाही. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जिल्ह्यात अजून एक मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र कालच्या मंत्रिमडंळ विस्तारानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून मेधा कुलकर्णी या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र २०१९ च्या निवडणूकीत पक्षाने मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. चंद्रकात पाटील सध्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मागील महिन्याभरापासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहिली जात होती. अखेर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. दौंडचे आमदार राहुल कुल, पर्वती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या माधुरी मिसाळ या देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, मिसाळ यांची पुण्यातून पहिल्या महिला मंत्री होण्याची शक्यता आता मावळली आहे.

चंद्रकांत पाटलांचा अल्प परिचय

चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ मध्ये झाला. जुलै २०१६ पासून ते ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूल, सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे ते मंत्री होते. जुलै २०१९ पासून भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. त्यांचे वडील बच्चू पाटील हे मिल कामगार होते. मुंबईमधील प्रभुदास चाळीमध्ये त्यांचे बालपण गेलं. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील दादर येथील राजा शिवाजी विद्यालय म्हणजेच किंग जॉर्ज शाळेत झाले. फोर्ट यथील सिद्धार्थ महाविद्यालयातून १९८५ साली त्यानी पदवी प्राप्त केली. विद्यार्थी परिषदेतील संघटनात्मक बंधणीचे त्यांच्यातील गुणवैशिष्ट्य पाहून भाजपचे नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांनी त्यांना पक्षाचे काम करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. २००४ मध्ये त्यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती झाली. २०१३ मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली. या निवडणुकीत शरद पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करुन ते विधान परिषदेत पोहचले. २०१३ मध्ये पक्षाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली. यानंतर २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवून विजयी झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजनिक बांधकाम इत्यादी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१६ पासून ते महसूल, सार्वजनिक बंधाकाम खात्याचे मंत्री होते. तसेच दिवंगत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार सोपवण्यात आला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra