अट्टल सोनसाखळी चोरट्यांना बेड्या, तब्बल ९ गुन्ह्यांची उकल

(✍️मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
ठाणे : कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत असतानाच कोपरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी रोहित रमेश चौबे (वय-२७ वर्षे) याला अटक करून तब्बल ९ सोनसाखळी गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे. तर, आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ४ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करीत आहे.
५ ऑगस्ट रोजी कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विठ्ठल मंदीर, चेंदणी कोळीवाडा परिसर, कुंभारवाडा परिसरात ४ वाजण्याच्या सुमारास दोन आरोपींची जेष्ठ नागरिक असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून महिलेला धक्काबुक्की करीत पोबारा केला. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या खबऱ्याच्या माहितीनुसार, कोपरी पोलिसांनी राबोडी परिसरातून आरोपी प्रतीक दत्तात्रय सितारपराव ऊर्फ भावडया(वय २२ वर्षे) याला अटक केली. चौकशीत त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार रोहित रमेश चौबे (वय २७ वर्षे) याच्या मदतीने केल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तीनहात नाका परिसरातून आरोपी रोहित चौबे याला अटक केली. त्याच्या चौकशीत चौबे याने त्याचे साथीदार आरोपी सागर दिनेश वाघ(वय २४ वर्षे ), महेश दिनेश वाघ (वय २२ वर्षे) यांच्या मदतीने कोपरी पोलीस ठाणे हद्दीत चालूवर्षी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने आरोपींचा मागोवा काढीत आरोपी सागर वाघ आणि महेश वाघ यांना कळवा परिसरातून अटक केली. या चारही सराईत गुन्हेगारांनी कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ७ जबरी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तर, अटक आरोपी प्रतीक सितापराव ऊर्फ भावड्या व रोहित चौबे यांच्या चौकशीत त्यांनी वागळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसापूर्वी सोनसाखळीचा गुन्हा केल्याचीही कबुली दिली.
या अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची लुटीतील मुद्देमाल विकण्यासाठी त्यांचे सहकारी वसीम रफीक मकानदार(वय २८ वर्षे ) आणि पूर्णाचंद्र गैरहरी मैती (वय ४१ वर्षे) यांच्याकडे ठेवण्यास दिल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर मुद्देमाल हा कोपरीतील ७ गुन्हे, वागळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ आणि कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा यातील मुद्देमाल असल्याचे पोलिसांनी सांगितले.



