लातूरमध्ये माणुसकीच्या नात्याला काळीमा! महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत शेजारीच राहणाऱ्या नराधमाने केला अत्याचार

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
लातूर : अंध आणि मूकबधिर असलेल्या एका महिलेला ऊसाच्या फडात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या गातेगावमध्ये घडली आहे.
पिडीत महिलेच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपीने हे कृत्य केले आहे. घराजवळ असलेल्या ऊसात ओढत नेऊन अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी गातेगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीला तक्रार नोंदवायला टाळाटाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
गातेगाव पोलिसांच्या हद्दीत असलेल्या गातेगाव या गावात दोन अंध-मूकबधिर महिला आपल्या भावाच्या कुटुंबासोबत राहतात. पीडिता आणि आरोपी हे शेजारी शेजारी आहेत. पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आरोपी बाळासाहेब साबळे हा गेल्या काही दिवसांपासून पीडिता आणि तिच्या बहिणीसोबत घरी येऊन छेडछाड करायचा.
पीडिता ही अंध आणि कर्णबधिर असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने पिडीतेला घराजवळच्या शेतात ओढत नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. पिडीतेचा आरडा-ओरडा ऐकून काहींनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता आरोपीने पळ काढला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप
पिडीता आणि तिचे नातेवाईक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर गुन्हा दाखल करायला कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे गुन्हा दाखल करायला वेळ लागला असा नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे.



