अमरावतीत गांजाची मोठी तस्करी, स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत तब्बल ४३५ किलो गांजा जप्त, ४ आरोपींचा करेक्ट कार्यक्रम

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
अमरावती :अमरावतीतून गांजाची मोठी तस्करी होत असल्याचे उघड झालं आहे. नुकताच पोलिसांच्या कारवाईत तब्बल ४३५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
आंध्रप्रदेशमधून अमरावतीत गांजाची मोठी वाहतूक होत आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी सापळा रचून गांजाची होणारी तस्करी हाणून पाडली आहे. यात ४ आरोपींसह ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आरोपी व मुद्देमाल चांदूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. यासंदर्भात अधिक तपास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी करीत आहेत.
अशी आहेत अटक आरोपींची नावे
आंध्र प्रदेशातून अमरावतीत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सापळा रचला. यात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. ऋषभ पोहोकार (२५, रा. रिद्धपूर, मोर्शी), विक्की युवनाते (२०, रा. शिरजगाव कसबा, चांदूर बाजार), शेख अरबाज शेख इलियास (१९, आझादनगर, अमरावती) आणि शेख तौसिफ शेख लतिफ (१९, रतनगंज, अमरावती), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली ही उत्कृष्ट कारवाई
ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नितीन चुलपार, संतोष मुंदाने, रवींद्र बावने, बळवंत दाभणे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, मूलचंद भांबूरकर, मोहन मोरे, अमोल देशमुख, विलास रोकडे, नीलेश डांगोरे, नितीन कळमकर, प्रमोद शिरसाट यांनी ही कारवाई केली.



