गोळीबार करत गाडीतील साडेतीन कोटींची रोकड लुटली, पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर हायवेवर असलेल्या वरकुटे पाटी येथे अनोळख्या इसमाने स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
गाडीवर गोळीबार करत गाडीतील ३ कोटी ६० लाख रुपयांच्या रोख रकमेसह एकूण ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून चोरट्यांनी पोबारा केला आहे. भावेशकुमार अमृत पटेल (वय ४० वर्षे) असे लुटण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पटेल यांच्या फिर्यादीनुसार, इंदापूर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांच्या विरोधात कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासाकामी पाच पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
भावेशकुमार पटेल हे मूळचे गुजरात येथील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. पटेल हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीने गुरुवारी रात्री उशिरा सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चालले होते. यादरम्यान इंदापूरजवळ मौजे वरकुटे पाटी गावच्या हद्दीमध्ये चार अनोळखी इसमांनी पायी चालत येऊन हातामध्ये लोखंडी टॉमी दाखवून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु पटेल यांनी गाडी भरधाव वेगात सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने नेली. यामुळे स्विफ्ट गाडी आणि टाटा कंपनीच्या गाडीमधून पाठलाग करत चोरट्यांनी स्कार्पिओ गाडीचा पाठलाग सुरु केला. मात्र गाडी थांबवली जात नसल्याने चोरट्यांनी गाडीवर गोळीबार करत गाडी अडवली. त्यानंतर गाडीमधील दोन व्यक्तींना हाताने मारहाण करत गाडीमधील ३ कोटी ६० लाख रुपये आणि जवळील १४ हजार रुपये, तसेच एक विवो कंपनीचा १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असे एकूण ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने खेचून चोरट्यांनी पोबारा केला.
याप्रकरणी भावेशकुमार पटेल यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार धस, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट दिली आहे.
पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केली आहेत. लवकरच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश येईल.
उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. गणेश इंगळे



