Uncategorized

सणउत्सव विषेश : जाणून घ्या हरितालिकेचे व्रत कसे करावे,

हरितालिका आणि गणेशोत्सव हे पाठोपाठ येणारे सण. प्रेम करणं, हव्या त्या व्यक्‍तीशी लग्न करणं अनादी काळापासून चालत आलेलं आहे. अशीच आजच्या आधुनिक काळालाही लाजवेल अशी प्रेमाची उत्कट कथा म्हणजे हरितालिका व्रत.

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरितालिका’ असे म्हणतात.

अखंड सौभाग्य राहावे यासाठी हरितालिकेचे व्रत केले जाते, अशी आपली परंपरा आहे. भाद्रपद महिन्यात शुक्‍ल पक्षाच्या तृतियेस हे व्रत करण्यात येते. “हर’ हे भगवान शंकराचेच नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास “हरतालिका’ म्हणून संबोधण्यात येते. “हरी’ हे भगवान विष्णूचे नाव आहे. हरितालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहेत.

पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते. कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले. या व्रतासाठी “हरतालिका’ किवा “हरितालिका’ दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो.

हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी, असा अर्थ आपण लावू शकतो. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्‍चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला “हरितालिका’ असे म्हणतात. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे.

हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे. शिवा भूत्वा शिवां यजेत। या भावनेने हरितालिकेची पूजा करावी, असे म्हटले जाते. कुमारिका आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून “हरितालिका’ हे व्रत अत्यंत मनोभावे करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रियाही हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्या हे व्रत आजन्म करतात.

हरितालिकेचे कथा

हिमालय पर्वताचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव “पार्वती” असे ठेवण्यात आले. सर्वसाधारण बापाप्रमाणेच आपल्या कन्येचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, हे पर्वतश्रेष्ठा! तुझ्या या सुस्वरूप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली, पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला आणि पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्‍चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्‍त झाडाची कोवळी पाने खाऊन राहात होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला “अपर्णा’ असे नाव पडले. तिच्या तपश्‍चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा. शंकराने “तथास्तु’ म्हटले व निघून गेले.

पार्वतीचा शोध घेत घेत हिमवान त्या अरण्यात पोहोचला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय आपल्या वडिलांना सांगितला व भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला. तिचा दृढनिश्‍चय व श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी लावून दिला. पार्वतीची निष्ठा, श्रद्धा व भक्‍ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला “पार्वतीपती’ असे नामाभिधान पडले. पत्नीमुळे नवऱ्याला नाव मिळणे हा खरं तर स्त्रीचा केवढा गौरव आहे. आज असे पाहायला मिळत नाही.

हरितालिका व्रत कसे करावे?

पार्वतीने आपल्या कडक तपश्‍चर्येने व प्रेमाने मनाजोगता पती मिळावला. तसेच व्हावे म्हणून स्त्रिया हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही पित नाहीत.

रात्री १२ वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी असे थोडेसेच खाऊन उपवास करतात. ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.

या व्रतामध्ये स्वच्छ केलेल्या जागेवर रांगोळी काढून चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून अनेक झाडांच्या पत्री (पाने), फुले यांसह पूजा केली जाते. या पूजेत जी पत्री वाहतात त्यात जाई, शेवंती, पारिजातक, तुळस, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळींब, आंबा यांची पाने वाहतात. सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे, अशी प्रार्थना करून आरती केली जाते. या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळही खेळतात.

हरितालिकेच्या दिवशीस उपवास का?

पूर्वकाली पर्वतराजाची कन्यापार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वती अरण्यात जाऊन शिवाची तपश्‍चर्या करू लागली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतिया होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. शिवपार्वती किंवा उमा महेश्‍वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात. स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व यांच्या मेळातून विश्‍वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्त्वांचे पूजन करतो. आदिशक्‍तीच्या पूजनातून या तत्त्वाचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची पद्धत आहे.

विविध राज्यांतील हरितालिका व्रत

दक्षिण भारतात अनेक कुमारिका हे व्रत करतात. गुजराथमध्ये किंवा पश्‍चिम बंगालमध्ये हरितालिका नसते. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितियेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत करतात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra