धक्कादायक! औरंगाबाद पोलीस आयुक्तालयासमोरच ३५ वर्षीय महिलेने घेतले पेटवून, कारण अद्याप अस्पष्ट

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
औरंगाबाद : ३५ वर्षीय महिलेने औरंगाबाद येथील पोलीस आयुक्तालयासमोर पेटवून घेतल्याची घटना घडली. ही खळबळजनक घटना आज गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. दरम्यान पोलिसांनी तात्काळ धाव घेत महिलेच्या अंगावर कपडे टाकले.
दरम्यान दामिनी पथकाने तात्काळ महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केले. पेटवून घेतलेल्या महिलेचे नाव सविता दीपक काळे (वय ३५ वर्ष, रा. मांडवा, गंगापूर) आहे. पेटवून घेतलेल्या महिलेचे छाती,पोट, हात, पाय भाजले असून तिच्यावर घाटी रुग्णालयात जळीत कक्ष उपचार सुरू आहेत.
मात्र महिलेने जाळून घेण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे महिलेसोबत कोणीही नातेवाईक नसल्याने पोलिसांना जबाब घेण्यास अडचण येत असल्याची माहिती समोर येत आहे.



