आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राला अखेर मिळाला मुहूर्त; राज्यपालांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन

पुणे : गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राला अखेर मुहूर्त मिळाला असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (दि.६) भूमिपूजन करण्यात येणार आहे. दरम्यान, या उपकेंद्रासाठी राज्य शासनाने जागा दिल्यानंतर निधीअभावी हा विषय प्रलंबित होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नगर येथे उपकेंद्र व्हावे, याकरिता गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. तत्कालीन सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांच्यासह अन्य सदस्यांनी उपकेंद्रासाठी जागा निश्चित करण्यापासून पाठपुरावा केला होता. नगर व नाशिक या ठिकाणी उपकेंद्र व्हावे, हा उद्देश होता. २०१४ साली या उपकेंद्राकरिता जागानिश्चितीसाठी प्रयत्न करण्यात आले. सुरुवातीला नगर शहराच्या जवळ जागा पाहण्यात आली. मात्र, ती पसंत न पडल्याने नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद या गावात ८० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी या जागेला विद्यापीठाचे नाव लागल्यानंतर तेथे संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन कुलगुरूंनी उपकेंद्रसाठी शासनाकडे निधी मागणार नसून, शासनाने केवळ उपकेंद्र मंजूर करून देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर उपकेंद्र मंजूर होऊनही त्याचे काम पुढे होऊ शकले नाही. बाबुर्डी बेंद गावातील ग्रामस्थांनी उपकेंद्र सुरू होण्यासाठी आपल्या मुलांना नोकरी देण्याची अट घातली होती. त्यामुळे या उपकेंद्रचा भिजत घोंगडे पडले होते. आता या उपकेंद्राच्या भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला असून, मंगळवारी (दि. 6) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ऐनवेळी हा कार्यक्रम ठरवून परस्पररीत्या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यातील स्थानिक सिनेट सदस्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे या केंद्राला जागा व निधी मिळाला आहे. यासाठी माजी सिनेट सदस्य प्रशांत गडाख, अभय आगरकर, शिवाजी साबळे यांनी प्रयत्न केले. मात्र, निमंत्रणपत्रिकेवर त्यांचा उल्लेखच नाही. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू काळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असला, तरी उपकेंद्रासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनाच निमंत्रणपत्रिकेत स्थान न मिळाल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.



