वन विभागाच्या कर्मचारी व तस्करांमध्ये झटापट! वन अधिकार्यांनी हवेत गोळीबार करत चौघांना ताब्यात घेत बिबट्याची कातडी केली जप्त

नाशिक : बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्या टोळीचा इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने पर्दाफाश केला आहे. नाशिक उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी सोमवारी (दि.५) कारवाई करत चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत वन विभागाच्या कर्मचारी व तस्करांमध्ये झटापट झाली. यावेळी वन अधिकार्यांनी हवेत गोळीबार केला होता. प्रकाश लक्ष्मण राऊत (वय ४३, रा. रांजणपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर), परशुराम महादु चौधरी (३०, रा. चिंचुतारा, ता. मोखाडा, जि. पालघर), यशवंत हेमा मौळी (३८, रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर), हेतु हेमा मौळी (३८, रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वनविभागाने गुप्त बातमीवरुन बनावट ग्राहक पाठवला होता. बिबट्या या वन्यप्राण्याच्या कातडीची खरेदी करण्यासाठी मौजे अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे संशयित आरोपी बिबट्याची कातडी घेऊन आला असता त्याच ठिकाणी सापळा रचण्यात आलेल्या इगतपुरी ( प्रादेशिक ) वनक्षेत्रातील कर्मचारी व सदर आरोपी यांच्यात झटापट झाली. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी हवेत गोळीबार केला. या कारवाईत वनकर्मचार्यांनी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेली बिबट्या प्राण्याची कातडी व दोन दुचाकी वाहन ताब्यात घेतल्या. वनअधिकार्यांनी वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांना बनावट ग्राहक बनवून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्या व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला. त्या व्यक्तींनी या व्यवहारासाठी ठराविक रक्कम देऊन व्यवहार करण्याचे ठरवले. मात्र, चारवेळा या व्यक्तींनी आपली ठिकाणे बदलून हूल देण्याचा प्रयत्न केला. अखेर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे हा व्यवहार करण्यासाठी पथक पोहोचले. यावेळी संबंधित व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी अधिकार्यांशी झटापट केली. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी हवेत गोळीबार केला. सर्व पथकाने यावेळी प्रतिकार करून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी बिबट्याच्या अवयवाची तस्करी करणार्या मोठ्या रॅकेटला गजाआड केले. या रॅकेटमध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्यसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील तस्कर असावेत असा संशय आहे. यासह तस्करांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असावे अशी शक्यता वर्तवली जाते आहे. या कारवाईत नाशिक उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, शैलेश झुटे, पोपट डांगे, सचिन दिवाने यांच्यासह वनरक्षक फैजअली सय्यद, आर. टी. पाठक, मुज्जू शेख, गुव्हाडे, पी. डी. गांगुर्डे, जी. डी. बागूल, विठ्ठल गावंडे, एस. पी. थोरात, सी. डी. गाडर, राहुल घाटेसाव, वनरक्षक संतोष बोडके, एम. ए. इनामदार, मधुकर चव्हाण, वनरक्षक एन ए गोरे, के. वाय. दळवी, एस. ए. पवार यांनी सहभाग घेतला.
वन्यप्राणी अवयव तस्करीप्रकरणी आणखी संशयित आरोपींचा शोध सुरु आहे. या आरोपींवर कारवाई केली जाणार आहे.: केतन बिरारीस, वन परिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी



