गुन्हे

अकोल्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांचा भर चौकात भोसकून खून

✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे

अकोला : अकोल्यात ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.

अकोला शहरातल्या जठारपेठ चौकात त्यांच्यावर रविवारी संध्याकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना लगेचच स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं. पण मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अकोल्यातील ठाकरे गटाचे शिवसेनेचे अकोला उपशहर प्रमुख विशाल कपले हे त्यांच्या स्कूटीवरुन जात होते. मात्र काही हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर वाटेतच एके ठिकाणी त्यांना गाठलं आणि चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये ३३ वर्षीय विशास कपले हे गंभीररीत्या जखमी झाले होते. रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मूळचे मोठी उमरी येथील रहिवासी असलेल्या विशाल कपले यांच्या मृत्यूने अकोल्यात खळबळ माजलीय. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र अद्याप कुणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. तीन ते चार युवकांनी विशाल कपले यांचा पाठलाग केल्याचं बोललं जातंय. महाकाली माता मंदिरापासून कपले यांचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर जठारपेठ येथील कोरडे हॉस्पिटल येथील गल्लीत वळताच त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला चढवण्यात आल्याचं सांगितलं जातंय. जखमी विशाल यांच्यावर अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अकोला शहरातल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. आता याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास करण्यात येणार आहे. विशाल यांच्यावर हल्ला करणारे कोण होते, याचा छडा लावण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय. ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra