
✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे
अहमदनगर – राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकरी चारशे रुपये घेतले जात असल्याने या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, या संदर्भात आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान राज्याचे महसूल मंत्री विखे यांनी काही दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यात दौरा केल्यानंतर अशा प्रकारची पैशाची मागणी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यभरामध्ये सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा विषय सर्वत्र गाजत चाललेला आहे, जास्तीचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सुद्धा जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यातच शेतामध्ये असलेली उभी पिके ही भुईसपाट झालेली आहे सोयाबीन, कापूस, गहू यासारखे अनेक पिके ही वायाला गेलेले आहेत तर भाजीपाल्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे.
शेतकऱ्यांनी नुकसानीचा पंचनामे करून आम्हाला तत्काळ मदत द्या अशी मागणी सुद्धा या अगोदर सरकारकडे केलेली आहे तर तसेच विविध राजकीय पक्षांनी सुद्धा या विषयाकडे लक्ष वेधून सरकारकडे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्यातील आहे त्यांनी गेल्या चार दिवसांमध्ये नगर जिल्ह्याचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दौरा करत वेळप्रसंगी त्यांनी हेलिकॉप्टरची मदत घेत त्यांनी बांधावर जाण्याचा प्रयत्न केला व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती. तातडीने पंचनामे करून ते सादर करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी येथील जिल्हा प्रशासन दिले होते ,त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये सध्या तहसील कार्यालयामार्फत तसेच कृषी विभागामार्फत गावोगावी पथक नेऊन हे पंचनामे केले जात आहे. अद्यापपर्यंत पंचनामे पूर्णत्वाला गेलेले नाही त्यामुळे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही.
गेल्या तीन दिवसापासून नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून यामध्ये संबंधित कृषी अधिकाऱ्याने जे पथक पंचनामा करण्यासाठी नेमले आहेत त्या पथकाने प्रत्येकी एकरी चारशे रुपये प्रमाणे पैसे संबंधितांकडून घ्यायचे तरच त्यांचा पंचनामा करायचे असे अलिखित आदेश काढले होते. एक पथक नेवासा तालुक्यामध्ये गेले असता त्या ठिकाणी त्यांनी संबंधित शेतकऱ्याला एकरी चारशे रुपये प्रमाणे पैसे द्या म्हणून सांगितले. त्याने त्याचा विरोध केला. या सर्व बाबींचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याने तुम्हाला कोणी सांगितले अशी विचारणा केली असता मोरे मॅडम यांनी आम्हाला अशा प्रकारचे आदेश दिले असल्याचे सांगून आत्तापर्यंत कोणी कोणी आम्हाला पैसे दिले याची सुद्धा माहिती त्यांनी त्या शेतकऱ्याला लेखी कागदाद्वारे दाखवलेले आहे.
शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी मागितले ४०० रुपये, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार pic.twitter.com/uWuYFmjXeF
— Maharashtra Mitra (@Maharashtramitr) October 31, 2022
दरम्यान, नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारची मदत झाली नाही, असे असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनाच आपल्या लोकसंख्येचे पैसे मिळण्यासाठी एकरी चारशे रुपये देण्याची वेळ येत असेल. हाही प्रकार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यामध्ये घडत असेल. तर आता ज्या राधाकृष्ण विखेंनी नगर जिल्ह्यामध्ये दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी प्रयत्न केला व त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. मग त्यांची पाठ वळल्यानंतर असा प्रकार घडला कसा, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे.
दरम्यान या संदर्भामध्ये कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘या प्रकरणाबाबत आमच्याकडे तक्रार आलेली आहे, त्या संदर्भात आम्ही निश्चितपणे याची दखल घेऊ,या संदर्भातली व्हिडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे, याची माहिती आमच्याकडे आली आहे’, असे त्यांनी सांगितले. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जर शेतकऱ्यांना शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकरी जर संकटात सापडलेला आहे तर आम्ही कशी काय दिवाळी साजरी करायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता. मग दुसरीकडे आता अशा अधिकारी वर्गाने पैसे घेण्यास सुरुवात केल्यामुळे नेमका हा प्रकार कशा पद्धतीने चालू झाला याचीच चर्चा सध्या रंगू लागलेली आहे.




